दुःख 🖤🤍🖤

आज पुन्हा जुनाच विषय नव्याने घेऊन आलीये . मी या आधीही दुःख या विषयावर लिहिले आहे. परंतु यावेळी दुःखाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन थोडा वेगळा  आणि  व्यापक आहे. 
या विषयावर पुन्हा लिहावे वाटले यामागे काही कारणे आहेत. कारण तसेच काही अनुभव गेल्या काही महिन्यात मी घेतले आहे आणि तेव्हाच मला या दुःखाची जाणीव झाली ती नव्याने.  
हो ..... पहिल्यांदा लेखात "मी" असा उल्लेख करत आहे. या आधी मी लेखात "आपण" असा उल्लेख केला आहे. परंतु यावेळी माझे अनुभव मी मांडणार आहे. खरं तर मला असे लिहायचे नव्हते, पण दुःखाकडे पाहण्याचा तुमचाही दृष्टिकोन थोडा बदलावा म्हणून लिहिते. मला जे जाणवले, जे पाहिले , जे अनुभवले  ते फक्त स्व: स्तरावर आहे, म्हणून प्रत्येकाच्या बाबतीत असेच घडेल असे असू शकत नाही म्हणून "मी".

आपल्याला जर कोणी विचारले की तू दुःखात आहेस का?  काही प्रॉब्लेम ,टेन्शन आहे का?  तर बऱ्याचदा लोक काही नाही म्हणून तो विषय टाळतात. पण प्रॉब्लेम, टेन्शन ,दुःख कोणाला नसतात. सगळेच यातून जात असतात आणि तो आपल्या आयुष्य जगण्याचा एक भागच आहे .एकवेळ प्रॉब्लेम, टेन्शन काही काळाने नाहीसे होतीलही पण दुःख नाही......जर मला कोणी विचारले की तू दुखात आहेस का? तर मी म्हणेल हो..... मी दुःखात आहे  म्हणूनच मी "आनंदात" आहे. विरोधाभास वाटतोय ना पण हो हेच सत्य आहे. प्रत्येक वेळी नकारात्मक भावनेकडे एकाच कोणातून ( नकारात्मकतेच्या ) पाहण्याची गरज नसते कधीतरी  सकारात्मकतेनेही आपण पाहू शकतो जसे मी पाहिलं..
आता हेच दुःख मला आनंद कसे देतो हे जाणून घेण्यापूर्वी एक नक्की सांगावेसे वाटते. माझा दुःखाबद्दल असा दृष्टिकोन काही एका दिवसात झाला नाही. त्यासाठी बराच काळ झुरत गेले तेव्हा कुठे मी या विचारांपर्यंत येऊन पोहोचले आणि आयुष्य जगण्याच्या या प्रवासात स्वतःला एका वेगळ्या स्तरावर पाहू शकले.
माझ्या आयुष्यात घडलेल्या दोन अशा घटना म्हणजे नियतीने माझ्या दोन्ही गालावर मारलेली सणसणीत चपराक . कदाचित भ्रमातच जगत होते मी ,परंतु नियतीला हे मान्य नव्हते. माझ्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना मला  नव्हती आणि याचीच जाणीव करून देण्यासाठी याच नियतीने माझे दोन्ही  कानशील रंगविले.  स्वप्नातून, भ्रमातून किंवा झोपेतून खडबडून जागे केले आणि मला वास्तवात आणून फेकले.  पण यासाठी मी नियतीला कधीच दोष देणार नाही उलट आभारच मानते. कारण  यामुळेच मला माझ्या दुःखाची जाणीव झाली ती वेगळ्या पद्धतीने.
खरं सांगू का, हो मला हे दुःख हवंय ....माझ्या आत खोलवर, कायम सलत राहायला, टोचत राहायला हवय. कारण या भावनेमुळेच मला इतर गोष्टींची जाणीव होते. जसे व्यक्ती, वास्तू ,वस्तू यांची किंमत कळते, त्याबद्दल आदर, प्रेम ,संवेदना निर्माण होतात आणि त्यांच्या अस्तित्वाची कमी जाणवते.... दुखद परिस्थिती आणि घटनेबद्दलचे गांभीर्य आणि महत्त्व समजते, त्या घटनेमागचे कारण आणि त्याचा उद्देश काय असेल यावर विचार करता येतो . या दुःखामुळेच मी कायम वास्तवतेत राहू शकते. वैयक्तिक विकसनासाठी दुःख आणि समस्या ही आवश्यक असतात. समस्या आल्या की दुःख ही ओघाने येतातच. आणि हीच दुःखे आपल्याला आपल्या सामर्थ्य आणि  मर्यादांची जाणीव करून देतात.
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या दुःखाला एकदा तरी सामोरे जावेच लागते आणि प्रत्येकाला दुःख भोगाव लागते. व्यक्ती आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण जितके साजरे करत नाही तितकेच जास्त वाट्याला आलेले दुःख उगाळत बसतो. पण त्याच दुःखाकडे जर सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर असे समजते की दुःखच आपल्याला अधिक शहाणे आणि समजूतदार बनवतात, दुःख आपल्यातला "मी" पणा मिटवतो, इतकेच नाही तर आपण एकांतात कुठलीही तक्रार न करता, कारणे न सांगता ,वाट्याला आलेली दुखे भोगायला हवी. कारण मिळालेली व मिळवलेली सोबत, मानवी नाती, आलेल्या परिस्थिती  ही वरवरचे आणि लवकर विरणारी असतात. म्हणून आपला शोक आवरून दुःखाची सोबत स्वीकारायला हवी. दुःख आपले मानसिक संतुलन टिकवून ठेवू शकतात. भावानीक आधाराचे परावलंबत्व तोडण्याचे सामर्थ्य देतात आणि आपल्याला एक कणखर व्यक्ती बनवू शकतात.  वाट्याला आलेले दुःख उगाळत बसण्यापेक्षा त्यांना स्वीकारून त्यांना उजाळा द्यावा. त्यामुळे आपले विचार  प्रगल्भ होतात आणि मन स्थिर राहते . कारण दुःख एक शाश्वत सत्य आहे. पण त्यापूर्वी हवा एक दृढनिश्चय आणि एक व्यापक दृष्टिकोन तरच हे शक्य होऊ शकते.  दुःखाबद्दल द्विधा मनस्थितीत तळमळत बसण्यापेक्षा त्याला पचवण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. नाहीतर बरेच जण दुःख आहे म्हणून व्यसनाधीन होऊन, सोशिकतेचा आव आणून, निराशेच्या गर्तेत अडकून पडतात आणि नशिबाला दोष देतात .आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला इतर कोणीच जबाबदार नाही हे स्वीकारायला हवं. दुःखाचे या पद्धतीने आकलन झाल्यानंतर असं जाणवलं की खरंतर मी दुःख भोगतच नाही तर उपभोगतीय.....  विना तक्रार स्वीकारलेल्या या दुःखामुळे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अवघड प्रसंगाला हिमतीने तोंड देता येते . जितके जास्त दुःख आपण विना तक्रार स्वीकारू तितकेच आपण आसक्ती रहित आयुष्य जगू शकू  आणि या चक्रातून मुक्त होत जाऊ
जे घडायचे ते घडतच राहणार ते परिवर्तन आहे. ते होतच राहणार. सगळं काही अनित्य आहे. ते फक्त आपण स्वीकारायचे असत. यावर आपले नियंत्रण नसते आणि म्हणूनच वेदना , दुःख हे एक प्रकारे आपले गुरुच असतात असे म्हणण्यास हरकत नाही. आता दुःखाचा हा टोचलेला काटा मला माझ्या हृदयातून काढायचा नाहीये. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत हवय मला माझे दुःख..... पण हो हे मात्र विचारू नका की तुला काय दुःख आहे. त्याचं कारण किंवा निमित्त काहीही असो पण मला या दुःखासोबत "आनंद" अनुभवायचा आहे.  नाण्याला असणाऱ्या दोन बाजू प्रमाणे.
सुख -  दुःख.
🖤🤍🖤


टिप्पण्या

  1. सुख आणि दुःख हेच तर जीवनाचा सार आहे...
    हे नसेल तर मनुष्य जीवन व्यर्थ आहे

    उत्तर द्याहटवा
  2. दुःखाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन बनविणारा सुंदर लेख....

    पुढील लेखनास शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  3. Yeah rohii you nailed it!
    One more new way of looking at our LIFE

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट