प्रेम 🖤🤍🖤
आज पुन्हा एकदा प्रेम या भावनेवर लिहावसं वाटलं. फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचे दिवस. कॉलेज, महाविद्यालयांमध्ये विविध दिवस साजरे केले जातील आणि व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्याची सांगता होईल. हा दिवस जरी पाश्चात्त्य संस्कृतीतून आला असला तरी या दिवसाचे निमित्त करून बरेच जण आपल्या प्रेमाची कबुली एकमेकांना देतील.
याच निमित्ताने मी ही आज पुन्हा एकदा प्रेम या भावनेवर जरा विस्तृत आणि थोडे सखोल असे लिहिणार आहे. ( प्लीज वाचायचा कंटाळा करू नका)
आपण बऱ्याचदा असे ऐकतो किंवा म्हणतो, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे पडले आहे, परंतु मला असं वाटतं प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमात उभे राहिलो आहे किंवा राहिले आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल . कारण प्रेम कधीच कोणाला पडू देत नाही प्रेम आपल्याला नव्या उमेदीने जगायला शिकवतो. प्रेम आपल्या आयुष्याला वळण , विचारांना प्रवाह,आणि जगण्याला दिशा, देते. प्रेमामुळे व्यक्तीला स्थैर्य आणि संतुलन मिळते. आपल्यातला आत्मविश्वास जागवतो. मुळात प्रेम भावना इतकी शुद्ध असते की व्यक्ती आपोआपच या भावनेत चमकू लागतो, स्मित हास्याची झळाळी चेहऱ्यावर तरळू लागते.
प्रेम भावना किंवा त्याची व्याख्या शब्दात व्यक्त करणे जरा अवघडच आहे, प्रेमाला शब्दात बंदिस्त करणे कठीणच... प्रेम ही भावना स्वतंत्र आहे एक मुक्त प्रवाह जो कायम वाहत असतो. ही इतकी व्यापक भावना आहे की आपण जितके त्याच्या तळाशी जाऊ तितके आपण आणखी खोल जात जातो.
एखाद्याला विचारलं की प्रेमाची सुरुवात कशी होते तर बऱ्याचदा काळजी घेणे ,आदर करणे, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडणे, एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य आवडणे ,आकर्षण अशी साधारण उत्तर येतील. परंतु मला वाटते प्रेमाची पहिली पायरी असते ती दुःख....... हो दुःख....कारण दुःख झालं की जाणीवा होतात,जाणीव झाल्या की भावना जागृत होतात , भावना जागृत झाल्या की प्रेम उत्पन्न होते मग इथून पुढे सुरुवात..... प्रेमाची.....
गोंधळून जाऊ नका याचे जिवंत उदाहरण म्हणजे एका स्त्रीने आपल्या बाळाला जन्म देणे. नऊ महिने ती त्या इवल्याशा जीवाला आपल्या उदरात सांभाळते आणि त्याचा जन्म होईपर्यंत अनेक शारीरिक, मानसिक यातना, वेदना सहन करत असते आणि जेव्हा त्या तान्ह्या जीवाला तिच्या तळहातावर ठेवले जाते तेव्हा त्याच्या नाजूक स्पर्शाने क्षणात तिला तिच्या वेदनांचा विसर पडतो आणि त्या बाळा प्रति प्रेम उत्पन्न होते. (हे प्राण्यांमध्येही असू शकत)
म्हणून दुःखही प्रेमाची पहिली पायरी
प्रेम आणखी विस्तृतपणे समजून घेण्यासाठी पाच टप्प्यांमध्ये त्याची विभागणी केली आहे.
१)समर्पण
२)भक्ती
३)त्याग
४)प्रतीक्षा
५)विरह
१) समर्पण :- देशाच्या सीमेवर लढणारा प्रत्येक सैनिक आपल्या मातृभूमीसाठी समर्पण भाव ठेवत असतो. स्वतःच्या जीवाची ही परवा न करता देश प्रेमासाठी स्वतःचा जीव पणाला लावतात. हीच ती समर्पण भावना. त्यांच्या इतकी समर्पण भावना इतर कोणीही ठेवू शकत असेल असे मला वाटत नाही.
२)भक्ती :- प्रेमाचे सर्वात सुंदर रूप असेल तर भक्ती. अगदी पवित्र रूप असते . तिथे स्वतःचा विसर पडून ज्याच्या प्रति प्रेम आहे त्यावर अपार भक्ती जाणवत राहते. भक्ती ही देवावरच असते असे साधारणपणे समजले जाते. जशी मीरेची कृष्णावर भक्ती, संतांची विठ्ठलावर भक्ती , आणि प्रत्येक भक्ताची आपल्या देवावर असलेली श्रद्धा. भक्ती म्हणजे त्यांच्यावर असलेले पवित्र प्रेम. त्या प्रेम रुपी भक्ती रसात व्यक्ती न्हाऊन निघते, त्याचे नामस्मरण, नामजप अविरत चालूच असते.मीराबाईचे कृष्णावर असलेले प्रेम हे सर्वात पवित्र प्रेम आहे.
३)त्याग :- बऱ्याचदा आपण एखाद्याच्या आनंदासाठी काही गोष्टींचा त्याग करत असतो. त्यागाच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपल्याला जी गोष्ट सर्वात हवीहवीशी वाटते तिचाच त्याग करणे. म्हणूनच जेव्हा कधी परिस्थिती अशा एका टप्प्यावर येते जिथे आपल्याला आपल्याच आवडत्या व्यक्तीचा तिच्याच सुखासाठी त्याग करावा लागतो, हेही प्रेमाचे सुंदर रूप आहे. जिथे स्वतः आधी समोरच्याचा हिताचा विचार केला जातो. अगदी निस्वार्थ, निरपेक्ष , विनाशर्त प्रेम असते इथे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ,आई वडील बऱ्याचदा आपल्या मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा ,अपेक्षांचा त्याग करत असतात.
४)प्रतिक्षा :- प्रतिक्षा करणे सुद्धा प्रेमाचा च एक भाग आहे. जर आपली व्यक्ती येणार आहे हे जेव्हा माहीत असते तेव्हा त्या व्यक्तीच्या आगमनाची ओढ लागते , त्यावेळी वाट पाहणे यातही वेगळीच मजा असते .परंतु व्यक्ती कधी येणार, येणार आहे की नाही हेच माहीत नसेल तरीही प्रतीक्षा केली जाते तेव्हा त्यातही एक अनोखा प्रेमभाव असतो. इथे मात्र थोडा त्रास होतो आणि एक भीतीही असते, जर ती व्यक्ती नाहीच आली तर हे.... माहीत असताना सुद्धा.... त्याच व्यक्तीवर प्रेम असणे म्हणजे प्रेमाची अद्वितीय अनुभूती. सोबत एक विश्वासही असतो जेव्हा ती व्यक्ती येईल तेव्हा तिच्या स्वागतासाठी आपण तितक्याच उत्स्फूर्तपणे सज्ज असले पाहिजे.
५) विरह :- विरहाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विरह फक्त शरीराचाच असतो आणि तोच त्रासदायक असतो. कारण शरीरच आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहे. विरह जाणवतो ती आपली व्यक्ती जेव्हा आपल्याला कायमची सोडून जाते ती परत कधीही न येण्यासाठी आणि काही व्यक्ती असूनही परत न येण्यासाठी. तेव्हा हा विरह प्रकर्षाने जाणवतो. विरह जरी शरीराचा असला तरी आपल्या व्यक्तीसोबत जगलेले क्षण, सुंदर आठवणी, आलेले अनुभव कायम आपल्या सोबतच असतात. ते मात्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अगदी आपले ज्यावर प्रेम आहे ती व्यक्ती सुद्धा .आणि तिथेच प्रेम एखाद्या स्थिरतेसारखे जाणवते. खरंतर प्रेमामध्ये कधीतरी विरह हा यावा, थोडे अंतर, थोडा दुरावा हा असावाच , कारण त्यायाशिवाय त्या नात्यातला ओलावा जाणवत नाही आणि नात्यातली विण किती घट्ट आहे याचा अनुभव येत नाही. विरहात याचा अनुभव घेऊ शकतो. विरह जरी असला तरी आपली प्रिय व्यक्ती मनाने, विचाराने, आणि घेतलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने ती कायम आपल्या सोबतच असते.... आपल्या आठवणीतून कधीही न जाण्यासाठी.
प्रत्येकाच्या आयुष्यात यापैकी एखादा टप्पा तर नक्कीच येत असेल. इतके असूनही प्रेमाच्या पुढचा एक स्तर आहे असे मला वाटते आणि तो म्हणजे "करुणा" ....अप्रतिम करुणा भाव .... हा भाव प्रेमाच्याही पुढे असावा कारण एखाद्याचे एखाद्यावर कितीही निरपेक्ष, निस्वार्थ प्रेम असले तरी मनाच्या कोपऱ्यात आणि विचारांच्या सूक्ष्म पातळीवर कुठेतरी अपेक्षा, हव्यास हा असतोच. एखाद्याला मिळवण्याची कामना आणि गमावण्याची भीती प्रेमा मध्ये असतेच. परंतु करूणे मध्ये तसे नसते समोरची व्यक्ती कशीही असली, वागली तरी तिच्याप्रती द्वेष भावना येत नाही आणि अपेक्षा ठेवत नाही. त्यांच्या कोणत्याही कृतीचे वाईट वाटत नाही, उलट कायम तिच्या हिताचा विचार आणि इच्छा मनात असते तोच करुणा भाव प्रेमाला मागे टाकतो. करुणा भाव....या स्तरावर पोहोचणे इतके सोपे नाही आणि आज कालच्या या चंचल, आभासी विश्वात कठीण पण अशक्यही नाही... विचारांची पवित्र बैठक आणि प्रेमाबद्दल समर्पण भाव असेल तर करुणा आपल्यातही उत्पन्न होते. कारण करुणा प्रेमच दर्शवितो. करुणा व्यक्तीला बंधनात ठेवत नाही, स्वातंत्र्य बहाल करते....
इतके की ज्यावर आपले प्रेम आहे त्याला अगदी आपल्यावर प्रेम न करण्याचेही स्वातंत्र्य देते.... मुक्त प्रवाह....
आसक्तीसह प्रेम हे बंधन .....तर आसक्ती शिवाय प्रेम ही करुणा .... मुक्ती.......
💞💕Happy Valentine Day 💞💕
सुंदर लिहिले आहेस...
उत्तर द्याहटवाAsmita kulkarni
हटवासुन्दर
उत्तर द्याहटवाThanks KisH 🖤🤍🖤
हटवा🖤🤍🖤
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाAwesome
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिले आहे
उत्तर द्याहटवाThanks Sangeeta Mam☺️
हटवाAwesome way of explaining "what true Love is"
उत्तर द्याहटवाActual meaning of true love
Thanks Sonam ☺️
हटवाप्रेम या भावनेचा विसर पडला होता, आपल्या सखोल लेख वाचनाने पूर्ववत जागृती झाली. निर्मला देवकाते ठोंबरे
उत्तर द्याहटवाThanks Nirmla ☺️
हटवा