स्वराज्य
स्वराज्याचा उल्लेख झाला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर महान क्रांतिकारक ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले.ज्यांनी आपल्याला जुलमी राजवटीतुन मुक्त केले. आता तुम्हाला वाटेल हे सगळ्यांनाच माहिती आहे, यात काय नवीन. बरोबर आहे, मी काही इतिहासातील पाने उलगडणार नाही.
स्वराज्य या शब्दकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहूयात. मुळात स्वराज्याची व्याख्या काय तर स्वतः चे राज्य,स्वशासन, आपले राज्य. गुलामगिरीतून मुक्तता..... थोर व्यक्तींच्या कर्तृत्वाने आपण जुलमी राजवटीतून मुक्त झालो, हे खरे ,परंतू थोड ...खोलात जाऊन विचार केला तर खरंच आपण स्वतंत्र आहोत? गुलामगिरीतून मुक्त झालो?
नाही. वरवर पाहता आपण जरी स्वतंत्र असलो तरी सध्याच्या काळात आपण सगळेच मानसिक गुलामगिरीत अडकलो आहोत,आणि हा गुलामगिरीचा विळखा इतका घट्ट होत चालला आहे की आपण आणखीनच यात वेढले जात आहोत. इतके की काही जण स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलून देऊन आपली जीवन यात्रा देखील संपवतात.
वर सांगितल्याप्रमाणे स्वराज्याची व्याख्या आपल्या सर्वांना माहीत आहेच, पण स्वराज्याची अजून एक व्याख्या म्हणजे स्वतःवर राज्य. म्हणजेच.... मी कोणाच्याही सवयीचा गुलाम नाही. कसे ते पाहू.
आज काल आपण मानसिकरित्या इतके कमकुवत झाले आहोत की, कोणीही आपल्याला सहजपणे नियंत्रीत करू शकतो. आणि आपण नकळतच समोरच्याच्या हातचे बाहुले बनतो. म्हणजे बघा ना कोणी काही बोलले, चेष्टा केली की आपण लगेचच प्रतिक्रिया देतो. रस्त्यावर, घरात ,कामाच्या ठिकाणी, महाविद्यालयात किरकोळ कारणावरून आपण वाद घालत बसतो. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की परिस्थिती हाताबाहेर जाते. बरेचसे मोठे गुन्हे देखील शुल्लक कारणावरून घडलेले असतात, आणि त्याचे वास्तविक रूपही भयंकर असते. बरीच उदाहरणे आहेत जे आपण रोजच वर्तमानपत्रात वाचतो. फक्त वादच होतात असे नाही, बऱ्याचदा आपण आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी सुध्दा समोरच्याच्या आग्रहाखातर सोडतो. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून गैरसमज निर्माण करून घेतो, त्यापूर्वी सत्यता पडताळून पाहण्याचीही गरज वाटत नाही. काहींच्या बाबतीत तर समोरच्यांची कृती पाहून सुद्धा आपली चिडचिड होते असते. याचाच अर्थ असा की आपल्या बुध्दी वर, आपल्या मनावर आपले नियंत्रण नसते. दुसरंच कोणी तरी आपल्या वर ताबा मिळवतो. आणि आपण फक्त खेळणं होऊन बसतो. आणि याची आपल्याला जाणीव सुद्धा नसते. आपण सहजपणे समोरच्याचा गुलाम होतो, मग कसले स्वतंत्र आपण? का आपलं नियंत्रण सुटते? का आपण समोरच्याच्या रागाला, मोहाला, त्यांच्या शब्दांना बळी पडतो....? कारण आपण मानसिक गुलामगिरीत अडकले आहोत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे तर स्वाभाविकच आहे. अकॅशन वर रिअकॅशन तर असणारच, परंतु या गोष्टी स्वाभाविक पण आपणच बनवलं आहे. थोडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आपणा सर्वांना आहे. त्यासाठी आपल्याला सावध राहून परिस्थितीचे आकलन करून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे. उत्तर देण्यापूर्वी ,वाद घालण्यापूर्वी आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच स्वराज्य करणे.....
या स्वराज्या मुळे त्यावेळची बाहेरील परिस्थिती जरी आपण बदलू शकत नसलो तरी आपली मानसिक स्थिती मात्र नक्कीच बदलू शकतो. आणि कालांतराने बाहेरील परिस्थिती सुध्दा हळूहळू बदलण्यास सुरवात होईल. बदल बाहेर घडवून आणण्यापेक्षा स्वतः मध्ये घडवणे खूप सोपे असते. प्रयत्न करून पाहा , तुम्हाला नक्कीच याची प्रचीती येईल. आपण स्वतःला खूप शांत फील करू शकतो. पण त्यापूर्वी आपण कोणाचाही गुलाम नाही हे मात्र कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वराज्य (स्वतः वर राज्य ) करा. म्हणजेच काय तर कोणी तुमची निंदा केली की,काही बोलले तर लगेचच डोक्यात राग घालून घेऊ नका, किंवा कोणी कौतुक केले तर हुरळून जाऊन हवेतही जाऊ नका. या दोन्ही परिस्थितीत ज्याला आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवता आली, त्याला स्वराज्य जमले.
बर ही स्वराज्याची व्याख्या काही मी बनवली नाही, कुठे तरी ऐकली आहे. बऱ्याच जणांना या सगळ्या गोष्टी माहीतही असतील, तरी पण ज्यांना माहीत नाही, त्याच्यापर्यंत हे विचार पोहचावे हा प्रामाणिक उद्देश. आता हे तुम्हाला ठरवायचे आहे, आपण कोणाच्या हातचे खेळणं बनायचे का स्वतःला नियंत्रीत ठेवून स्वराज्य करायचे.
control yourself ....not on others
Actually true but no one thinks about it....lets start now at least...
उत्तर द्याहटवाखुप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवा