प्रवास 🖤🤍🖤
नुकतीच डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि त्याच बरोबर गुलाबी थंडीची चाहूलही लागली आहे तेव्हा बऱ्याच जणांनी प्रवासाचे, पिकनिकचे बेत ही आखले असतील. प्रवास करायला, फिरायला जायला सगळ्यांनाच आवडत हो ना....
प्रवास म्हटलं की एक वेगळीच ओढ असते ना ....!! आपल्या ठरलेल्या पॉईंटवर, इच्छित स्थळी जाण्यासाठीची ओढ ,गडकिल्ले,निसर्ग,
समुद्रकिनारे , देवस्थान ,श्रद्धास्थान तिथले सौंदर्य आणि पावित्र्य , नाविन्य डोळ्यात साठवण्याची आतुरता, एक नवीन अनुभव घेण्याची उत्सुकता....आणि त्याचबरोबर प्रवासाला जाण्यासाठी च्या तयारीची लगबग.
प्रवासाला जाण्यापूर्वी आपण बऱ्याच गोष्टींची तयारी करतो. तसेच प्रवासात आपल्याला काही सहप्रवासी ही भेटतात. त्यांची सोबत जरी तात्पुरती असली तरी त्यांच्यामुळे हा प्रवास सुखकारक होतो. (याबाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो हा ...)
पण मी आज इथे एका वेगळ्या प्रवासा संदर्भात बोलणार आहे . आपल्या आयुष्यातही बरेच जण येतात ,त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रवासाचा काही काळ सुखकारक होत असतो . काही व्यक्ती आपल्या आयुष्यात ठराविक कालावधी साठी तर काही मोठ्या कालावधी साठी येतात. . आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला काहींची सवय होऊन जाते आणि नकळत त्या व्यक्ती आपल्या जीवनाचा भाग बनून जातात. पण अचानक एक अशी वेळ येते की ती व्यक्ती आपल्याला कायमची सोडून जाते कधी ही परत न येण्यासाठी तर काहीजण जाणून पाठ फिरवतात. आणि मग आपल्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते आणि राहते ते फक्त रितेपण, एकटेपण.......
असे म्हणतात की ,मुक्कामाच्या ठिकाणापेक्षा किंवा इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यापेक्षाही प्रवास हा खूप सुंदर असतो, जेव्हा आपला साथीदार आपल्या सोबत असतो . तेव्हा वाटते की हा प्रवास संपूच नये. डेस्टिनेशन वर पोहोचल्यावर जितका आनंद होतो कदाचित त्याहीपेक्षा जास्त आनंद हा प्रवासात मिळत असतो कारण आपल्या व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय ठरतो . पण एक प्रवास असाही आहे जिथे प्रवासापेक्षाही मुक्कामाचे ठिकाण, डेस्टिनेशन हे खूप सुंदर आहे . या प्रवासात मात्र साथीदर नसतो बर का...... तरीही डेस्टिनेशन खूप सुंदर, अप्रतिम असते. आणि तो प्रवास म्हणजे एकटेपणा आणि डेस्टिनेशन म्हणजे एकांत.......
इतर प्रवासापेक्षा इथला प्रवास हा खूप कठीण असतो . कधी कधी भयावह , त्रासदायक, निराशा जनक . या प्रवासात एक खोल काळोखी दरी जाणवत राहते, जणू या या दरीने मोठा" आ " वासला आहे आणि तो आपल्याला गिळू पाहत आहे. आणि आपण हळूहळू त्यात लोटले जात आहोत अशी जाणीव होत राहते या प्रवासात हा अनुभव रोजच घ्यावा लागतो त्यामुळे बऱ्याच यातनातून, वेदनेतून , मानसिक त्रासातून व्यक्ती जात असते. आणि या प्रवासात असतो फक्त आपण एकटे... एक भयान शांतता.....
परंतु याच एकटेपणाला मिठी मारून त्याला आपली ताकद बनवली तर आपण एकांताच्या ठिकाणी पोहोचतो आणि हे ज्याला जमले त्याला पुढील आयुष्य जगता आले.
एकटेपणाला एकांतात रूपांतरित करणे इतकेही सोप्प नाही बर का..... या काळोख्या दरीत लोटले जात असताना आपण कुठेतरी अंधारात हरवत असल्याची तीव्र जाणीव होत असते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण तिथे चाचपडत बसतो आणि अचानक आपल्याला वैचारिक पातळीवर एक आशेचा एक किरण दिसू लागतो.
थोडे जागरूक होऊन जर आपण आपली आंतरिक शक्ती वापरली तर त्या एकटेपणाच्या काळोखातून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो आणि तिथून पुढे सुरू होतो एक वेगळा प्रवास एकटेपणाकडून एकांताचा. मग या एकांता पेक्षा सुखकारक काहीच वाटत नाही . मग एकटेपणातील तीच भयान शांतता वास्तविक आनंद देऊन जाते. एकांतात असलेले सामर्थ्य एकांतात गेल्याशिवाय समजत नाही. आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यावर जो आनंद , अनुभव आपण घेतो तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त असा खोल आनंद, अनुभूती आपण एकांतात अनुभवू शकतो. एकांत हा अद्वितीय असतो. बऱ्याचदा व्यक्ती एकटेपणाला घाबरते पण याच एकटेपणातून एकांताकडे केलेला प्रवास इतर कोणत्याही प्रवासापेक्षा अतुलनीय असतो. कारण तिथे आपलीच आपल्याशी नव्याने ओळख होते आणि आपल्याला एक नवा साथीदार मिळतो.तोच आपल्या प्रत्येक दुःखात आपली सोबत बनतो आणि तो साथीदार आपण स्वतः असतो.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकटेपणाचा हा टप्पा कधीतरी येतोच , काहींच्या बाबतीत तो क्षणिक असेल , तर काहींच्या बाबतीत कायमस्वरूपासाठी......
प्रत्येकाला या परिस्थितीतून कधीतरी जावे लागणार म्हणून एकांताच्या प्रवासाची वाटचाल आत्तापासूनच करायला हरकत नाही. कारण एकांतात मिळणारा अनुभव हा खरंच अप्रतिम असतो. जाणीवांच्या उच्चतम कोटीवर पोहोचणारा असतो.
अजून एक गोष्ट आपण जगभरातील कितीही ठिकाण फिरलो तरी आपल्या सगळ्यांचं लास्ट डेस्टिनेशन ठरलेलं असतं बर का आणि ते म्हणजे मृत्यू...... अंत .....
हा प्रवास नियतीने याच पद्धतीने ठरवला आहे म्हणूनच एकटेपणाकडून एकांताकडे होणारा प्रवास आणि एकांताकडून अंताकडे होणारी वाटचाल ही तितकीच सत्य आणि शाश्वत आहे . कारण प्रत्येक अंत एका नव्या पर्वाची सुरुवात असते. कारण एकांत (एक +अंत) अंताचीच जाणीव करून देत असतो......
प्रवास,प्रवाह आणि प्रेरणा .....
उत्तर द्याहटवाआत्मसुखाच्या प्रवाहात प्रवास हा फक्त प्रवास नसून ती आत्मेची अतिउच्च तृप्ती आहे....
एकांत ही एक सुंदर अनुभूती आहे..
☺️☺️Thanku
उत्तर द्याहटवासुरेख ब्लॉग
उत्तर द्याहटवा